moppings and musings of a family

Saturday, December 20, 2008

हिंदीचा मराठीवरील प्रभाव

मराठीवरील हिंदीचा प्रभाव हिंदी वळणाच्या शब्दांच्या वापरामुळे नकोसा वाटतो हे खरे आहे पण तसे वाटू नये. इतर भाषांमधील शब्दांच्या वापरातून भाषा समृद्धच होत असते. मात्र हिंदी धाटणीच्या प्रयोगांमुळे आणि वाक्यांमुळे मराठीची धाटणी बिघडू देणे योग्य नाही.
हिन्दीला झोडपणे हा काही मराठीची प्रगती करण्याचा उपाय होऊ शकत नाही. इंग्रजीपेक्षा हिन्दी किंवा इतर कोणतीही भारतीय भाषा आपल्याला सुसह्य असायला हवी. वयं पंचाधिकंशतं हे मान्य असायला हरकत नसावी. सध्या आपल्याला भय्यांचा उपद्रव होतोय म्हणून हिंदीचा दुस्वास करणे योग्य होणार नाही. चांगली हिंदी आपण अभावानेच ऐकतो/वाचतो. चित्रपटांची भाषा हिंदी नसून हिंदुस्थानी आहे. शासकीय हिंदी भाषा सदोष घडणीची आणि कृत्रिम आहे. साहित्य अकादमीतर्फे प्रसिद्ध होणारे "समकालीन भारतीय साहित्य' चांगल्या हिंदीसाठी वाचावे.


"मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरवरून ऍप्लिकेशनचे बीटा व्हर्जन डाऊनलोड करा.' हे वाक्य मराठीच राहील. "घासलेट के लइन में खडा रैके बोम क्यूं मारता है रे ?' हे वाक्य उत्तर प्रदेशात कोणालाही समजणार नाही, पण ते हिंदीच आहे. (हे नमुन्याचे वाक्य खुशवंतसिंगांचे आहे)

रागवायचेच असेल तर आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालणाऱ्या मराठी माणसांवर रागवावे. जिच्या भाषेचा (म्हणजे मातृभाषेचा) अभिमान बाळगायचा ती माताच मुलाला इंग्रजी माध्यमात घालण्यासाठी आग्रही असते (नणंदेचा मुलगा इंग्लिशला आहे मग माझा का नको?) हा दैवदुर्विलास आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा हे महाराष्ट्रात फालतू हिंदीचा प्रसार होण्याचे मुख्य कारण आहे. ह्यापैकी बहुसंख्य कॉस्मो आणि इंटरनॅशनल वगैरे शाळांचे माध्यम इंग्लिश असले तरी चलन इंग्लिश नसून संमिश्र हिंदीचे आहे. टुकार वाहिन्यांनी आणि चुकार जाहिरातवाल्यांनी जणू नव्या सर्जनशीलतेचा आविष्कार केल्याच्या आविर्भावात हिंग्लिशला डोक्यावर चढवलेले आहे. उथळ अभिरुचीच्या नव्या उच्चशिक्षितांच्या गळी आपले म्हणणे उतरवणे त्यामुळे ह्या माध्यमांना सोपे जाते.

आज शाळाशाळांमधून सेमी(!)इंग्लिशच्या कुबड्या घेऊन मराठी माध्यम तग धरण्याचा प्रयत्न करीत आहे. आजच्या भाषांच्या ऱ्हासावरून अंदाज बांधणाऱ्या संशोधकांचे म्हणणे असे आहे की अजून पन्नास वर्षांनी जगात फक्त 7 भाषा शिल्लक उरतील. हिंदी ही त्यापैकीच एक आहे. हे वास्तव नजरेआड करून चालणार नाही. 'इंग्रजीचे ज्ञान' हा भारतीय विद्यार्थ्यांना जगाच्या बाजारपेठेत पसंती देणारा घटक आहे हे खरे असेल तर हिंदीसारखीच लिपी असणे हे मराठीला पुढेमागे व्यावहारिक दृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. (भय्यांना मराठी बोलता येत नसेलही पण वाचता येते.) ज्यावेळी आपल्या मताचा प्रसार करण्याची वेळ येते त्यावेळी बहुसंख्यांची भाषा वापरण्याची क्षमता कामी येते. नामदेवमहाराज आणि रामदासस्वामींच्या हिंदी रचनांचा उद्देश ह्या संदर्भात ध्यानात घेण्याजोगा आहे.

खंडप्राय देशाच्या प्रशासनासाठी आणि प्रगतीसाठी व्यवहाराची समान भाषा ही अपरिहार्यता ठरू शकते. ह्या बाबतीत चीनचे उदाहरण लक्षणीय आहे. (किंबहुना आजच्या प्रमाण मराठी भाषेने आपले स्थान प्राप्त करण्यासाठी मराठीच्या अनेक बोली भाषांचा गळा घोटलेला आहे.)

तख्त फोडण्याचे सामर्थ्य असलेली मराठी मनगटे तराजू पेलण्याचे व्यावहारिक शहाणपण दाखवणार की नाही असा विचार मराठीप्रेमी माणसांनी करायला हवा. माहिती तंत्रज्ञानामुळे प्रसाराचे कार्य सुकर झाल्याने अनेक मरणासन्न भाषांना नवसंजीवन मिळण्याची शक्यता काही विद्वानांनी व्यक्त केलेली आहे.

No comments: