moppings and musings of a family

Sunday, October 26, 2008

सुशिक्षित समाजांचे मत

भारतासारख्या देशांमध्ये अजूनही निरक्षरतेचे लक्षणीय प्रमाण असल्याने शैक्षणिक गुणवत्तेबाबत भारतीय मतदार आग्रही असण्याचे दिवास्वप्न आपण पाहू शकत नाही. परंतु सध्या गाजत असलेल्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत शिक्षकांच्या गुणवत्तेचा प्रश्न महत्त्वाचा ठरू शकतो असे जाणकारांना वाटते.

पी आर ब्लॉगमध्ये शैक्षणिक गुणवत्तेचा विषय विस्ताराने हाताळला जात आहे. समाजाच्या भवितव्यासाठी शिक्षण ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे हे भान अनेक समृद्ध देशांनाही पुरेसे आलेले आहे असे नाही. शिक्षकांची गुणवत्ता हा शैक्षणिक गुणवत्तेचा एक महत्त्चाचा किंबहुना प्राथमिक घटक आहे. त्यासाठी देशात शिक्षकांच्या प्रशिक्षणाविषयी जागरुकता असणे आणि हे प्रशिक्षण संदर्भहीन होऊ नये म्हणून प्रशिक्षण यंत्रणा तत्पर आणि कार्यक्षम असणे अनिवार्य आहे. भारतातील प्रगत राज्यांमध्ये अशा यंत्रणा अस्तित्वात आहेत आणि त्यांचा दर्जाही सुधारत आहे. परंतु जागतिक प्रगतीचा रेटा ध्यानात गेता त्यांच्या विकासाची आणि कार्याची गती फारच कमी पडते आहे.

समाजमताच्या रेट्यांमुळे राज्यकर्त्यांना ह्या प्रश्नाची निकड जाणवावी अशी परिस्थिती जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत प्रशिक्षण यंत्रणांच्या दर्जासुधारासाठी खाजगी क्षेत्रावर आणि सेवाभावी संस्थांच्या तुटपुंज्या प्रयत्नांवर अवलंबून राहण्याखेरीज गत्यंतर नाही.

No comments: